🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

बुधवार, ४ मार्च, २०२६

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी ।
कोरडे ते मानी बोल कोण ।।१।।
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ।
न चलती चार आम्हांपुढे ।।२।।
निवडी वेगळें क्षीर आणि पाणी ।
राजहंस दोन्ही वेगळालीं ।।३।।
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें ।
येरा गाबाळाचें काम नोव्हें ।।४।।


ही संत तुकाराम महाराजांची अत्यंत थेट आणि स्पष्ट अभंगवाणी आहे. यात ते सांगतात की अध्यात्मात फक्त बोलण्याने किंवा कथा सांगण्याने काही होत नाही, अनुभव आणि सत्याची कसोटी महत्त्वाची असते. 🌼
अर्थस्पष्टीकरण "नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण" येथे कोणी फक्त दंतकथा किंवा कोरडी बोलणी सांगू नयेत. खऱ्या साधनेत रिकाम्या गप्पांना किंमत नसते. "अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हांपुढे" येथे खरा नियम म्हणजे अनुभव. दिखावा, शब्दांचे खेळ किंवा चार लोकांना भुलवणारी बोलणी येथे चालत नाहीत. "निवडी वेगळें क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळालीं" राजहंस जसे दूध आणि पाणी वेगळे करतो, तसेच सत्य आणि असत्य याची ओळख करणे आवश्यक आहे. "तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें, येरा गाबाळाचें काम नोव्हें" तुकाराम म्हणतात — येथे खरी पात्रता, शुद्धता आणि प्रामाणिक साधना लागते; उथळ किंवा अज्ञान वृत्तीने हा मार्ग साधत नाही.

🌿 सारांश :

अध्यात्मात दिखावा नाही, अनुभव महत्त्वाचा. सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे गरजेचे. प्रामाणिक साधना आणि अंतरीची शुद्धता हाच खरा मार्ग
“नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

“नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण…”
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ भक्तीचा उपदेश नाही, तर तो विवेक, चिकित्सकता आणि सत्यशोधनाचा घोष आहे. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की अध्यात्माच्या नावाखाली भाकडकथा, चमत्कारांच्या गोष्टी आणि सांगोवांगीच्या दंतकथा सांगून सत्य सिद्ध होत नाही. कोणतीही गोष्ट स्वीकारायची असेल तर तिचा प्रत्यक्ष अनुभव आणि पुरावा असला पाहिजे.

वैदिक परंपरेत प्रामुख्याने ग्रंथप्रामाण्य आणि गुरुप्रामाण्य मानले गेले. ग्रंथात लिहिले आहे म्हणून ते सत्य मानायचे, गुरु सांगतात म्हणून त्यावर प्रश्न न विचारता विश्वास ठेवायचा अशी अपेक्षा होती. शंका घेणे म्हणजे अविश्वास मानला जाई. पण तुकाराम महाराजांची भूमिका वेगळी आहे. ते सांगतात की अनुभवाशिवाय विश्वास ठेवू नका.

“अनुभव येथे व्हावा शिष्टाचार,
न चलती चार आम्हांपुढे…”

म्हणजेच येथे केवळ गप्पा, थापा किंवा दिखावा चालत नाही. सत्याला अनुभवाची कसोटी लागते. तुकाराम महाराज पुढे एक सुंदर उदाहरण देतात — राजहंसाचा नीर-क्षीर न्याय. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळे करतो, तसेच माणसाने सत्य आणि असत्य यांची निवड केली पाहिजे. समाजात अनेक कल्पना, कथा, परंपरा आणि श्रद्धा असतात. त्यातले सर्वच सत्य नसते. त्यातून सार आणि असार वेगळे करण्याची बुद्धी माणसाने वापरली पाहिजे. मानवी इतिहासात अनेक धार्मिक ग्रंथांत चमत्कारकथा आणि कल्पनारम्य वर्णने आढळतात. त्या त्या काळातील माणसाच्या कल्पनाशक्तीचे आणि मर्यादित ज्ञानाचे प्रतिबिंब त्यात दिसते. उदाहरणार्थ, आकाशात उडण्याची माणसाची जुनी इच्छा अनेक कथांमध्ये दिसते. त्या काळी प्रत्यक्ष विमानाची कल्पना करणे शक्य नव्हते, त्यामुळे पंख असलेल्या देवता, गरुडावर बसलेले देव किंवा पुष्पक विमान यांसारख्या कल्पना जन्माला आल्या. परंतु कल्पनाशक्तीचा हा प्रवास पुढे विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून वास्तवात उतरला. आज माणूस विमानातून आकाशात उडतो, अंतराळयानातून अवकाशात पोहोचतो आणि पाणबुडीतून समुद्राच्या तळाशीही जातो. हे सर्व घडले ते चिकित्सक विचार, प्रयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे. एकेकाळी भारत ज्ञान-विज्ञानात आघाडीवर होता. शून्याचा शोध भारतात लागला. पण पुढे अनेक शतकांत ज्ञानाचा प्रवाह थांबला. समाजात ज्ञानबंदी, जातीभेद आणि कर्मकांड वाढत गेले. समाजातील मोठा वर्ग शिक्षणापासून दूर राहिला. परिणामी जगात विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने पुढे गेले, आणि आपण मागे पडलो. युरोपमध्येही एकेकाळी धर्मगुरूंचे वर्चस्व होते. बायबलच्या विरोधात विचार मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना शिक्षा केली जात होती. पण तिथल्या समाजाने धर्मसत्तेविरुद्ध संघर्ष केला, नवीन विचार स्वीकारले आणि वैज्ञानिक क्रांती घडवून आणली. त्यामुळे आधुनिक विज्ञानाची प्रगती झाली. तुकाराम महाराजांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ते सांगतात की अंधविश्वास, दंतकथा किंवा बहुसंख्य लोकांचा आग्रह यावर सत्य ठरत नाही. “सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.” सत्य स्वीकारण्यासाठी आणि असत्य नाकारण्यासाठी धैर्य, विवेक आणि स्वातंत्र्यपूर्ण विचारसरणी लागते. तुकाराम महाराज म्हणतात — हे काम कोणत्याही ऐऱ्यागैऱ्याचे नाही. “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोव्हे.” येथील “जातीचे” म्हणजे जन्माची जात नव्हे, तर विचारांची लायकी आणि सत्यासाठी उभे राहण्याचे धैर्य. आजच्या काळात तुकाराम महाराजांचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा ती अनुभव, तर्क आणि पुराव्याच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. जे सत्य आहे ते स्वीकारण्याचे आणि जे असत्य आहे ते नाकारण्याचे धाडस समाजात निर्माण झाले, तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगात समाजाला जागवण्याची आणि विचारांची क्रांती घडवण्याची ताकद आहे. त्या अभंगांचा अर्थ समजून घेतला आणि जीवनात उतरवला, तर समाज अधिक विवेकी, जागृत आणि प्रगत होईल.

🙏जय जगद्गुरू तुकोबाराय! 🙏

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

पश्चात्तापाच्या उंबरठ्यावर उभं आयुष्य…

काही वर्षांपूर्वी मी एक कथा-कादंबरी वाचली होती. नाव आज आठवत नाही, पण तिचा मतितार्थ आजही मनात ठसठसतो आहे. ती कथा एका नर्सने सांगितलेली होती—ज्या दवाखान्यातील एका वॉर्डमध्ये शेवटच्या अवस्थेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत होती. काही दिवसांचे पाहुणे, काही तासांचे, तर काही क्षणांचे… अशा लोकांच्या अगदी जवळून तिने मृत्यू पाहिला होता. ती कथा सत्य घटनेवर आधारित होती. त्या नर्सने एक फार बोलकं सत्य मांडलं होतं— माणूस शेवटी पश्चात्ताप करतो. “मी असं करायला नको होतं…” “मी याच्याशी चुकीचं वागलो…” “मी खोटे आरोप केले…” “माझ्या अहंकारापायी नातं तुटलं…” मरण समोर उभं असताना, संपत्ती आठवत नाही, पद आठवत नाही, सत्ता आठवत नाही… आठवतो तो फक्त आपला अन्याय, आपली चूक, आणि न बोललेली माफी. आणि हे वाचताना एक प्रश्न मनाला बोचतो— आपण आज कुठल्या दिशेने चाललो आहोत? चूक दिसते, पण आपण तिला चूक म्हणत नाही. एखादी चुकीची गोष्ट घडते, पण “मला काय त्याचं” म्हणून दुर्लक्ष करतो. पैशासाठी मतदान करतो. “हा आपल्या पक्षाचा आहे” किंवा “हा आपल्या गटाचा आहे” म्हणून त्याच्या चुकीवर पांघरूण घालतो. अशा कितीतरी गोष्टी आपण रोज सहजपणे करत राहतो… पण थांबून कधी विचार करत नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे— आपण या जगाचे मालक नाही. तर काही दिवस काही वर्षे यासाठी येथे आलेले आपण इथे पाहुणे आहोत. आज नाही तर उद्या, कधी ना कधी… आपल्यालाही जायचंच आहे. मग जाताना, डोळे मिटताना, मनात पश्चात्तापाची जळजळ उरू नये— असं आयुष्य जगणं, असं वागणं, असं अनुकरण ठेवणं… हेच खरं यश आहे.

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

उलटे महाभारत

उलटे महाभारत जगात नेहमीच विजयी पताका ज्याच्या हाती रोवली जाते, त्याचाच जयजयकार होतो. इतिहास त्यांचाच लिहिला जातो. पराजितांना इतिहासात स्थान नसते— आणि असलेच, तर ते “खलनायक” म्हणूनच. विजय मिळवणाऱ्यांना देवत्व बहाल केलं जातं, तर हरलेल्यांच्या वाट्याला अधर्म, कपट आणि दुष्टतेची लेबले येतात. म्हणूनच— रावण दुष्ट ठरतो, कंस अत्याचारी ठरतो, आणि शकुनी कटकारस्थानी. पण खरा प्रश्न असा आहे की— जर युद्धाचा निकाल उलटा लागला असता तर? विजय कोणाचा, आणि सत्य कुणाचं? जर महाभारताच्या युद्धात कौरव जिंकले असते, तर आज श्रीकृष्णाऐवजी शकुनी पूजला गेला असता. कारण पांडवांच्या बाजूने जी रणनीती, जी राजकारणाची भूमिका श्रीकृष्णाने बजावली, तीच भूमिका कौरवांच्या बाजूने शकुनीने निभावली होती. दोघांचे ध्येय एकच होते— आपल्या बाजूचा विजय. फरक इतकाच की, एक जिंकला… दुसरा हरला. आणि जिंकणारा नायक ठरला, हरणारा खलनायक. शकुनी : कपटी की जखमी? इतिहास शकुनीला केवळ कपटी ठरवतो, पण त्याच्या वेदनांचा उल्लेख करत नाही. बहिण गांधारीवर झालेला अन्याय, संपूर्ण गांधार राज्याचा झालेला अपमान, हस्तिनापूरच्या सत्तेने दिलेली खोल जखम— या सगळ्यांचा बदला घ्यायचा होता. म्हणून शकुनी खेळत राहिला. राजकारण खेळला. डावपेच आखत राहिला. मग प्रश्न उरतोच— बदला घेणारा माणूस नेहमीच दुष्ट असतो का? की तो व्यवस्थेचा बळी असतो? तो खलनायक होता की पराजितांचा प्रवक्ता? इतिहास : सत्य नव्हे, विजयाची बाजू इतिहास नेहमी सत्य सांगतोच, असं नाही. तो बहुतेक वेळा विजयाची बाजू सांगतो. ज्या हातात सत्ता असते, ज्या गटाने युद्ध जिंकलं असतं, त्यांच्याच हातात लेखणी असते. आणि लेखणी जिथे असते, तिथेच नायक ठरवले जातात. विजेता नायक होतो. पराजित खलनायक. विजयासाठी वापरलेली नीती, कूटनीती, कपट, राजकारण— या सगळ्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. आणि पराभूतांच्या प्रत्येक कृतीला अधर्माचं लेबल लावलं जातं. उलटं घडलं असतं, तर… जर इतिहासाचा निकाल थोडासा जरी उलटा लागला असता, तर आज आपण पूजत असलेली देवताच कदाचित खलनायक ठरली असती. पांडव जिंकले—म्हणून ते धर्माचे प्रतीक झाले. कौरव हरले—म्हणून ते अन्यायी ठरले. श्रीकृष्ण जिंकले—म्हणून ते योगेश्वर झाले. शकुनी हरला—म्हणून तो कटकारस्थानी मामा ठरला. फरक नीतीत नव्हता. फरक निकालात होता. उलटे महाभारत का गरजेचं आहे? इतिहासाला खरा न्याय तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण तो फक्त विजेत्याच्या नजरेतून न पाहता पराजितांच्या वेदनांतूनही पाहतो. कारण सत्य एकाच बाजूला नसतं. ते नेहमी दोन टोकांमध्ये अडकलेलं असतं. आज गरज आहे— देव आणि दानव या सोप्या चौकटीतून बाहेर पडण्याची. कारण प्रत्येक “रावण” दुष्टच असतो असं नाही, आणि प्रत्येक “राम” निर्दोषही नसतो. म्हणूनच— उलटे महाभारत समजून घेणं आवश्यक आहे. जिथे विजय नव्हे, तर न्याय तपासला जाईल. इतिहास बदलता येत नाही, पण इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलता येते. ================================================================================================ शकुनी : खलनायक की शापित नायक? (उलटे महाभारत – भाग १) महाभारतातील सर्वात जास्त द्वेष केला गेलेला पात्र म्हणजे शकुनी. कटकारस्थानी मामा, फासे फेकणारा कपटी, युद्धाचा मूळ सूत्रधार — इतिहासाने त्याच्यावर सगळे दोष सोपवले. पण प्रश्न असा आहे की — शकुनी जन्मतःच दुष्ट होता का? की तो अन्यायाने घडवलेला शत्रू होता? शकुनी कुठून आला? शकुनी गांधार देशाचा राजपुत्र होता. तो केवळ दुर्योधनाचा मामा नव्हता, तर गांधारीचा भाऊ होता. हस्तिनापूरच्या सत्तेने गांधारीचं आयुष्य अंधारात ढकललं. दृष्टराष्ट्र अंध आहे, हे सत्य लपवून तिचं लग्न लावण्यात आलं. एका स्त्रीचा नव्हे, तर संपूर्ण गांधार राजघराण्याचा अपमान झाला. बदल्याची सुरुवात शकुनीने तलवार उचलली नाही. त्याने युद्ध केलं नाही. त्याने खेळ निवडला — राजकारणाचा खेळ. कारण त्याच्याशी लढणारी सत्ता तलवारीने नव्हे, तर डावपेचांनी पराभूत करायची होती. फासे, डाव, कारस्थाने — हे सगळं दुष्टपणाचं लक्षण वाटतं. पण हेच राजकारण पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णाने केलं, तेव्हा ते कूटनीती ठरलं. मग प्रश्न पडतो — कूटनीती आणि कपट यामधली रेषा नेमकी कुठे आहे? शकुनी विरुद्ध श्रीकृष्ण श्रीकृष्णाने पांडवांसाठी युद्धात नियम मोडले, रणनीती बदलल्या, अधर्म्याला अधर्माने हरवलं. इतिहास त्याला धर्मरक्षक म्हणतो. शकुनीने कौरवांसाठी तेच केलं, पण इतिहासाने त्याला कटकारस्थानी ठरवलं. फरक नीतीत नव्हता. फरक विजयात होता. शकुनीचा खरा अपराध शकुनीचा सर्वात मोठा अपराध असा की — तो हरला. इतिहास विजेत्यांचा असतो. पराजितांना दोषी ठरवलं जातं. जर कौरव जिंकले असते, तर आज शकुनी राजकारणाचा आद्य गुरू म्हणून ओळखला गेला असता. शकुनी : शापित नायक शकुनी हा राक्षस नव्हता. तो देवही नव्हता. तो एका बहिणीचा भाऊ होता, जिच्या आयुष्यावर अन्याय झाला. तो एका राज्याचा वारस होता, ज्याचा अपमान झाला. तो सूड घेत होता — दुष्टपणातून नव्हे, तर जखमांमधून. निष्कर्ष शकुनीकडे पाहताना फक्त त्याच्या फासांकडे पाहू नका. त्यामागच्या वेदना पाहा. कदाचित तेव्हा कळेल — खलनायक जन्मत नाहीत, ते घडवले जातात. ======================================================================================================== कर्ण : दानशूर वीर की जन्माने पराभूत? (उलटे महाभारत – भाग २) महाभारतातील सर्वात विरोधाभासी पात्र म्हणजे कर्ण. दानशूर, पराक्रमी, निष्ठावान — आणि तरीही इतिहासात तो हरलेला. कर्णाचा पराभव युद्धात झाला नाही, तो जन्मालाच झाला. ओळख नाकारलेली वीरता कर्ण कुंतीचा पुत्र होता. पण समाजाने त्याला रथकारपुत्र म्हणूनच ओळख दिली. राजपुत्र असूनही त्याला राजपुत्राचा मान मिळाला नाही. त्याच्या शौर्यापेक्षा त्याची जात मोठी ठरली. द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं. द्रौपदीने स्वयंवरात अपमान केला. पांडवांनी भाव असूनही कर्णाला स्वीकारलं नाही. मग प्रश्न असा आहे — ज्याला आयुष्यभर नाकारलं गेलं, तो माणूस धर्माच्या बाजूला कसा उभा राहणार? दुर्योधन : मित्र की गरज? दुर्योधनाने कर्णाला ओळख दिली. राजा केलं. सन्मान दिला. तो सन्मान स्वार्थाचा होता का? कदाचित. पण अपमानाच्या जखमेवर तोच एकमेव मलम होता. म्हणून कर्ण दुर्योधनासोबत उभा राहिला — अधर्मासाठी नव्हे, तर कृतज्ञतेसाठी. कर्ण विरुद्ध अर्जुन इतिहास सांगतो — अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर होता. पण प्रश्न असा आहे — समान संधी असती, तर कर्ण कमी पडला असता का? कर्णाकडे शस्त्र होती, पण कवच-कुंडल गेली. रथ चिखलात रुतला. शापांनी त्याची साथ सोडली. अर्जुन जिंकला. कर्ण हरला. पण युद्ध फक्त बाणांनी जिंकले जात नाही, ते परिस्थितीनेही जिंकलं जातं. कर्णाचा खरा अपराध कर्णाचा सर्वात मोठा अपराध असा की — तो चुकीच्या बाजूला उभा राहिला. पण त्या बाजूची निवड त्याने आनंदाने केली नव्हती. ती त्याच्यावर लादलेली होती. समाजाने त्याला ढकललं, आणि दुर्योधनाने उचललं. इतिहासाने निकाल दिला — अधर्मी. कर्ण : शापित धर्मवीर कर्ण निर्दोष नव्हता. द्रौपदीचा अपमान त्याच्या खात्यावर आहे. पण त्याच वेळी — त्याने आयुष्यभर दान केलं. मृत्यूपर्यंत मित्राशी निष्ठा ठेवली. तो धर्माच्या व्याख्येत बसला नाही, पण तो मानवतेच्या व्याख्येत नक्की बसतो. निष्कर्ष कर्ण आपल्याला एक प्रश्न विचारतो — धर्म म्हणजे नियम की न्याय? आणि न्याय म्हणजे संधी की निकाल? कदाचित कर्ण नायक नव्हता, पण तो खलनायकही नव्हता. तो होता — जन्माने पराभूत, पण मनाने अजिंक्य. ============================================================================================================= कंस : अत्याचारी का दुर्दैवी? (उलटे महाभारत – भाग ३) इतिहासात कंसाला अत्याचारी, अधर्मी आणि दुष्ट म्हणून दाखवले गेले आहे. परंतु प्रश्न असा आहे — तो जन्मतःच दुष्ट होता का, की परिस्थितीने त्याला त्याच मार्गावर ढकललं? ओळख आणि भीती कंस मथुराचा राजा होता. त्याच्या राज्याची सत्ता टिकवणे आणि जनतेची सुरक्षा ही त्याची जबाबदारी होती. परंतु त्याच्यावर भविष्यातील संकटाची भीती होती— मथुरेत जन्माला येणारा बालक त्याच्या गादीसाठी धोका ठरू शकतो, हा अंदाज योग्य होता की अतिरेकी? सत्य आणि अत्याचाराची रेषा कंसाने कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला— इतिहासात ते अत्याचार म्हणून पाहिले जाते. पण त्याच्या दृष्टीने हे राजकीय सुरक्षा उपाय होते. ज्यांना धमकी आहे, त्यांच्यावर कारवाई करणे राज्यशास्त्रात नियम आहे. कंसाचा “अत्याचार” त्याच्या भय आणि जबाबदारीचा फळ होता. कंस विरुद्ध वंशपरंपरा कंसाने अनेकदा कुंती, देवकी, वसुदेव यांच्यावर कठोर निर्णय घेतले. त्याचा हेतू व्यक्तिगत द्वेष नव्हता; तो सत्तेचा रक्षण होता. इतिहास त्याला अधर्मी म्हणतो, पण इतिहास विसरतो की— कंसाच्या निर्णयामागे भय, राजकारण आणि जबाबदारी होती. कंसाचा पराभव कंसाचा पराभव झाला, तोच इतिहासात नायक ठरला—कृष्ण. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की— कृष्णाच्या नैतिकतेत आणि योगातच विजय मिळाला, कंसाच्या कृतीत कदाचित काही चुकीचं नव्हतं. कंस : अत्याचारी की दुर्दैवी? कंस हा राक्षस नव्हता, पण इतिहासाने त्याला राक्षस ठरवलं. तो देवकीचा भाऊ, मथुराचा राजा, ज्याला भविष्याची भीती होती. त्याच्यावर आलेल्या संकटात तो कुशल राजा की फक्त भीतीने कारवाई करणारा? यावर विचार करणे गरजेचे आहे. निष्कर्ष कंस आपल्याला शिकवतो — इतिहासातले “अत्याचारी” नेहमीच खलनायक नसतात. त्यांची कृती परिस्थितीने आणि भयाने घडवलेली असते. कंसाचा पराभव केवळ विजय नव्हता, तो नियतीने घडवलेला निष्कर्ष होता. उलटे महाभारत आपल्याला शिकवते — विजय आणि पराभवाच्या पारंपारिक व्याख्या कायमच सत्य सांगत नाहीत.

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

 गिरी गव्हार कशासाठी ।

रागे पुरविली पाठी ॥१॥

ऐसा नसावा संन्यासी ।

परमार्थाचा होय द्वेषी ॥२॥

घर बांधणे डोंगरी ।

विषयी हिंडे दारोदारी ॥३॥

काय केला योगधर्म ।

नाही अंतरी निष्काम ॥४॥

गंगाजळ हृदय करा ।

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


             -श्री संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई महाराज


🌿 अर्थस्पष्टीकरण :

१️⃣ "गिरी गव्हार कशासाठी, रागे पुरविली पाठी"
संन्यासी होऊन डोंगरात राहणे (गिरीगव्हार करणे) याचा काय उपयोग, जर मनात अजूनही राग-द्वेष आहे तर? बाह्यसंन्यास घेऊन काही होत नाही, अंतर्मन शुद्ध असणे गरजेचे आहे.


२️⃣ "ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा होय द्वेषी"
जो परमार्थाचा द्वेष करतो — म्हणजे सत्य, प्रेम, आणि दयाभावापासून दूर राहतो — तो खरा संन्यासी नाही. संन्यासी तोच, ज्याच्या अंतःकरणात परमार्थाची प्रीत आहे.


३️⃣ "घर बांधणे डोंगरी, विषयी हिंडे दारोदारी"
डोंगरावर आश्रम बांधला, पण मन विषयी गोष्टींमध्ये रमले — तर असा बाह्य वैराग्य फोल ठरतो.


४️⃣ "काय केला योगधर्म, नाही अंतरी निष्काम"
जर मनात कामना, अहंकार आणि अपेक्षा आहेत, तर योगधर्म म्हणजेच आत्मशुद्धीचा मार्ग साध्य होऊ शकत नाही.


५️⃣ "गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा"
म्हणजे मन गंगाजळासारखं पवित्र करा, आणि मगच अंतःकरणाचे दार उघडा — तेव्हाच ज्ञानेश्वर (ज्ञान, ईश्वर) आपल्यात प्रकट होतील.


🌼 सारांश :
👉 बाह्य संन्यास नव्हे, तर अंतःकरणातील शुद्धता हाच खरा परमार्थ आहे.
👉 मुक्ताबाई आत्मशुद्धी, निष्कामता आणि अंतरीचा वैराग्य यांचे मर्म सांगतात.


शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

परियेसी गव्हारा सादर

 परियेसी गव्हारा सादर ।

कर्मे निर्वश झाले सगर ।
भिल्लें विंधिले शारंगधर ।
झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥


कर्मे मन्मथ झालासे राख ।
कर्मे चंद्रासि घडला दोष ।
कर्मे भार वाहती कुर्मशेष ।
कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥


कर्मे वासुकी लंके दिवटा ।
कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा ।
कर्मे शुकदेव गर्भी कष्टा ।
पाताळवाटा बळी गेला ॥३॥


कर्मे दशरथ वियोगें मेला ।
कर्मे श्रीराम वनवासा गेला ।
कर्मे रावण क्षयो पावला ।
वियोग घडला सीतादेवी ॥४॥


कर्मे दुर्योधनादि रणीं नासले ।
कर्मे पांडव महापंथें गेले ।
कर्मे सिंधुजळ शोषिलें ।
नहुष जाला सर्प देखा ॥५॥


कर्मातें शंभु मानी आपण ।
किती पळसि कर्माभेण ।
बापरखुमादेविवरविठ्ठला शरण ।
केलीं कर्मे निवारी नारायण ॥६॥


ही ज्ञानदेव माउलींची अमृतवाणी — "परियेसी गव्हारा सादर" — ही ओवी कर्मतत्त्वाचा गूढ पण सोपा अर्थ सांगणारी आहे.

🌿 भावार्थ व तात्पर्य

ही ओवी आपल्याला सांगते की —
या जगात कोणीही कर्माच्या फळापासून सुटत नाही.
देव, दानव, ऋषी, राजा — सगळ्यांनाच त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात.


परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वंश झाले सगर । भिल्लें विंधिले शारंगधर । झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥

  • सगरराजाचे सर्व पुत्र कर्मामुळे नष्ट झाले.

  • श्रीकृष्णाला देखील भिल्लाच्या हातून बाण लागला.

  • इंद्राने गुरुपत्नीगमन केल्याने त्याला भोगावे लागलेले अपमान (शरीरावर भगे पडणे) हे कर्मफळ.

👉 संदेश: कोणीही कितीही सामर्थ्यवान असला तरी कर्माचे दंड टाळता येत नाहीत.


कर्मे मन्मथ झालासे राख । कर्मे चंद्रासि घडला दोष । कर्मे भार वाहती कुर्मशेष । कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥

  • शंकराने कामदेवाला जाळले, चंद्राला शाप मिळाला,

  • विष्णूच्या अवतारांनी (कुर्म, शेष) पृथ्वीचा भार वाहिला,

  • आणि ब्रह्मदेवाला गाढवाचे मुख मिळाले — हे सारे त्यांच्या कर्मांमुळेच.

👉 संदेश: देवही कर्मबंधनातून मुक्त नाहीत.


कर्मे वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा । कर्मे शुकदेव गर्भी कष्टा । पाताळवाटा बळी गेला ॥

  • वासुकी नागाला रावणाकडे दिवा व्हावे लागले,

  • हनुमंतालाही ब्रह्मचर्याची कठोर परीक्षा आली,

  • शुकदेवाला दीर्घ गर्भवास भोगावा लागला,

  • आणि बळी राजा पाताळात गेला — हे सर्व कर्माच्या परिणामामुळे.

कर्मे दशरथ वियोगें मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला । कर्मे रावण क्षयो पावला । वियोग घडला सीतादेवी ॥

  • दशरथाला पुत्रवियोग झाला,

  • श्रीरामाला वनवास भोगावा लागला,

  • रावण नष्ट झाला,

  • आणि सीतेला पतीवियोग मिळाला — हे सर्व कर्मानुसार घडले.

कर्मे दुर्योधनादि रणीं नासले । कर्मे पांडव महापंथें गेले । कर्मे सिंधुजळ शोषिलें । नहुष जाला सर्प देखा ॥

  • दुर्योधन आणि कौरव युद्धात नष्ट झाले,

  • पांडवांना स्वर्गारोहणाच्या मार्गावर जावे लागले,

  • अगस्ती ऋषीने समुद्र प्यावा लागला,

  • नहुश सर्प झाला — सगळे कर्माचे फळ.


कर्मातें शंभु मानी आपण । किती पळसि कर्माभेण । बापरखुमादेविवरविठ्ठला शरण । केलीं कर्मे निवारी नारायण ॥

  • महादेवसुद्धा कर्माला मानतात,

  • मग माणसा, तू कुठे पळून जाशील?

  • म्हणून एकच उपाय आहे —
    विठ्ठलाच्या चरणी शरण जावे,
    कारण नारायणच कर्मबंधनातून मुक्त करतो.

सारांश

"कर्म हे अपरिहार्य आहे, पण भक्ति आणि आत्मबोधाने त्यावर मात करता येते."

अर्थ:-

हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल. कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. कर्मामुळेच भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला. कर्मामुळे इंद्रला गुरुपत्नीगमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले. कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला, चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्माना पृथ्वीचा भार वाहवा लागला तसेच ब्रह्म्याला गाढवाचे मुख प्राप्त झाले. कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले, मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली, शुकदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले. कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला, रामाला वनवासात जावे लागले, रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सितेला रामाचा वियोग प्राप्त झाला. दुर्योधनप्रभुतीना रणात मरावे लागले, पांडवांना महापंथ चालावा लागला, अगस्तीला समुद्र प्यावा लागला व इंद्रपदावर पोहचलेल्या नहुशराजाला सर्प योनीत जावे लागले. त्या कर्माला महादेव भितात, अशा त्या कर्मापासुन तु कुठे पळुन जाऊ शकतोस? या वर उपाय म्हणजे, माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात.

🌿 कर्माचा बोध – आधुनिक रूपांतर

हे माणसा, थांब थोडं...
कर्माचं गूढ जाणून घे.
जे झाले, जे घडतंय, जे होणार आहे –
ते सगळं या अदृश्य कर्माच्या धाग्याने विणलेलं आहे.


सगर राजाचे साठ हजार पुत्र गेले,
तो निर्वंश झाला – का?
कर्माचं फळ होतं ते.

भिल्लाने श्रीकृष्णालाही बाण मारला,
इंद्रालाही पापाच्या डागांनी अंग झाकावं लागलं —
कोणी वाचलं का कर्मातून?


शंकरालाही मदनाला जाळावं लागलं,
चंद्राला शाप भोगावा लागला,
शेष नाग आणि कुर्म अवतारांना
धरतीचा भार वाहावा लागला,
आणि सृष्टीचा जनक ब्रह्मालाही गाढवाचं मुख मिळालं —
हेच तर कर्माचं सामर्थ्य.


वासुकी नाग रावणाच्या दरबारात दिवा झाला,
हनुमंतालाही ब्रह्मचर्याचं व्रत निभावावं लागलं,
शुकदेवाला गर्भवासातच ज्ञान मिळालं,
बळी राजा पाताळात गेला —
कर्माची जाळी खोल आहे.


दशरथाला पुत्रवियोग,
रामाला वनवास,
रावणाला राज्याचा नाश,
सीतेला पतीवियोग —
हे सर्व कर्माचे वळण.


दुर्योधन रणात मेला,
पांडवांना दीर्घ प्रवास करावा लागला,
अगस्ती ऋषींनी समुद्र प्यावा लागला,
नहुश राजा सर्प झाला —
कर्मापासून सुटका कुणालाच नाही.


मग तू कुठे पळणार?
महादेवही म्हणतात —
“मी कर्मापुढे नमतो.”

मग तुझं काय चालणार रे जीव?
एकच मार्ग आहे —
विठ्ठलाच्या चरणी शरण जा,
कारण तोच कर्मबंधन तोडतो,
तोच नराला नारायण करतो.


💫 तात्पर्य

कर्म टाळता येत नाही, पण भक्तीने ते शुद्ध करता येते.
विठ्ठलभक्त झाल्यावर कर्म हे शिक्षा नसून साधना बनते.
म्हणून माउली सांगतात —
“कर्मापासून सुटू नकोस, पण कर्मात विठ्ठल पाह.”


मंगळवार, २९ जुलै, २०२५

अभिमानाचा क्षण – आप्पाचीवाडीच्या बैलजोडीचा संत वारीतील ऐतिहासिक सहभाग

 अभिमानाचा क्षण – आप्पाचीवाडीच्या बैलजोडीचा संत वारीतील ऐतिहासिक सहभाग

संत परंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि पंढरपूरच्या वारीचा सुवर्ण इतिहास अनुभवत असताना, आप्पाचीवाडी नगरीसाठी एक ऐतिहासिक गौरवक्षण समोर आला आहे.


आषाढी वारी २०२५ मध्ये,

श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथ ओढण्याचा मान,

देहू संस्थानमार्फत “मानिक व राजा” या बैलजोडीला लाभला!


ही बैलजोडी कोणी साधी नाही – तर आपल्याच आप्पाचीवाडी गावातील प्रगतशील शेतकरी मा. श्री बाबुराव अर्जुन खोत आणि खोत कुटुंबीयांनी विक्रमी रकमेने खरेदी केलेली – मजबूत, देखणी आणि सेवाभावाने ओतप्रोत भरलेली!


वारीचा प्रवास : देहू ते पंढरपूर, परतीचा प्रवास : पंढरपूर ते आळंदी

सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त

संत ज्ञानेश्वर माऊलींचा "सप्तशतक-उपार सुवर्ण महोत्सव"

आणि

संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्ष या पावन पर्वाच्या निमित्ताने

देहूच्या पवित्र मातीपासून सुरू झालेला रथयात्रेचा प्रवास,

पंढरपूर ते आळंदी असा परतीचा प्रवास सुद्धा याच बैलजोडीने यशस्वीरित्या पार पाडला.


या दोन्ही संतांच्या पादुकांची आळंदीत झालेली भेट,

आणि त्यावेळी मानिक व राजा या बैलजोडीच्या सेवेमुळे साकारलेली दिव्य पुण्याई –

हा आपल्या गावासाठी एक इतिहास ठरतो!


परतीचा प्रवास – आळंदी ते देहू आणि परत आप्पाचीवाडीमध्ये पुनरागमन

या ऐतिहासिक सेवेनंतर, आज मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी,

“मानिक व राजा” बैलजोडीने आपल्या श्री हालसिद्धनाथ महाराजांच्या संजीवन समाधीच्या पावन भूमीत,

आपल्या आप्पाचीवाडी नगरीमध्ये पुन्हा एकदा गौरवमय पुनरागमन केले आहे.


या बैलजोडीचे सहर्ष स्वागत,

आपण सर्वांनी गर्वाने, आनंदाने आणि भक्तिभावाने केले पाहिजे.


खोत कुटुंबीयांचे विशेष अभिनंदन

या ऐतिहासिक घटनेत सर्वात मोठा वाटा म्हणजे

श्री बाबुराव अर्जुन खोत व त्यांच्या परिवाराचा,

ज्यांनी आपल्या परिश्रमातून, श्रद्धेतून आणि सेवाभावातून ही बैलजोडी वारीच्या कार्यासाठी उपलब्ध करून दिली.


या सेवेमुळे केवळ गावाचं नाव उज्ज्वल झालं नाही,

तर संतपरंपरेत....... गावाचा ठसा उमटला!


पुण्याचीच ही सेवा असो – सतत पुढे चालू राहो...

“मानिक व राजा” या बैलजोडीचे,

त्यांच्या सेवेचे, आणि खोत कुटुंबाच्या पुण्यकर्माचे

हार्दिक अभिनंदन!


ईश्वरचरणी हीच प्रार्थना –

अशीच सेवा, असाच गौरव, आणि अशीच परंपरेशी निष्ठा येणाऱ्या काळातही सतत घडत राहो...!



✍️ – आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने,एक अभिमानाची आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली कृतज्ञ नोंद.

गुरुवार, २४ जुलै, २०२५

तुका म्हणे पाय डोकां” – संत तुकाराम महाराजांचा आत्मसमर्पणाचा अभंग

 



"आळसु पाळी विषयकर्मी
शक्ती देई तुझ्या नामीं ॥
होईन विनवणी विनवणी
विनवणी धरां मनी ॥
आणिक वचना मुकी वाणी
तुमच्या गर्जीं घालवीं गुणीं ॥
तुका म्हणे पाय डोकां
पाहें एरवी शांतबा ॥"

संत तुकाराम महाराज


अर्थ (स्वरूपानुसार):

  • "आळस पाळणारे विषयकामी लोक" – हे असे लोक आहेत की जे विषयांच्या मागे लागून (सांसारिक मोहात), आळस करत असतात.

  • पण "तुझ्या (विठोबाच्या) नामात तीव्र शक्ती आहे", जी ह्या आळसावर मात करू शकते.

  • म्हणून मी सातत्याने विनवतो, की हे नामस्मरण माझ्या मनात रुजावं.

  • गूढ वचनं किंवा गूंगे असलेल्यांनाही तू वाणी देतोस.

  • तुझ्या भक्तांच्या गरजेनुसार तू गुणांचं वितरण करतोस.

  • तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझ्या पायांवर माझं डोकं ठेवतो, हेच शांततेचं अंतिम स्थळ आहे.


हा अभंग निष्ठा, भक्ती आणि आत्मसमर्पण याचं उत्तम उदाहरण आहे. हे पंक्ती मनाला शांती, आळसावर मात करण्याची प्रेरणा आणि भगवंताच्या कृपेवर असलेली श्रद्धा दाखवतात.


🌸 अभंगाचा सारांश:

या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्या विठोबाच्या चरणांवर अपार श्रद्धा ठेवून आत्मसमर्पण व्यक्त करतात. ते सांगतात की, या जगात विषयांच्या (सांसारिक मोहांच्या) मागे लागलेली माणसे आळशी झाली आहेत. पण भगवंताच्या नामस्मरणात अशी शक्ती आहे की ती माणसाला त्या आळसातून बाहेर काढते.

तसेच ते म्हणतात, जे गूंगे आहेत त्यांनाही देव वाणी देतो, आणि जे गुणहीन आहेत त्यांच्यातही तो गुण भरतो. अखेरीस तुकाराम महाराज हे सर्व सांगून म्हणतात – "तुका म्हणे पाय डोकां", म्हणजेच, मी तुझ्या पायांवर माझं डोकं ठेवतो, हेच अंतिम शांतीचं स्थान आहे.


🕊️ आत्मिक अर्थ:

  • विषयासक्तीपासून मुक्ती – ज्या व्यक्ती विषयांच्या मागे लागलेली आहे, तिला नामस्मरणाचं औषध आहे.

  • विनयशील भक्ती – देवापुढे सातत्याने विनवणं केल्याने मन शुद्ध होतं.

  • नामातली शक्ती – नामस्मरण माणसाला आळशी, असमर्थ, गोंधळलेलं मन या सगळ्यातून बाहेर काढतं.

  • पूर्ण आत्मसमर्पण – भगवंताच्या पायांवर डोकं ठेवणं म्हणजे "मी काहीच नाही, सर्वकाही तू आहेस" ही भावना.


🌼 आजच्या काळात या अभंगाचं महत्त्व

आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनात आपल्याला सतत कुठेतरी शांती हवी असते. ती शांती आपण बाहेर शोधतो, पण ती आपल्या अंतर्मनातच दडलेली असते. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की:

  • भगवंताच्या नामात शक्ती आहे.

  • आळस, मोह, असमर्थता यावर मात करून आपणही चैतन्यशील, भक्तीपूर्ण जीवन जगू शकतो.

  • फक्त एक छोटं पाऊल – नामस्मरण, विनय आणि आत्मसमर्पण.


🙏 निष्कर्ष:

"तुका म्हणे पाय डोकां, पाहें एरवी शांतबा" हे वाक्य म्हणजे भक्तीचा सर्वोच्च शिखर. जिथे अभिमान, अपेक्षा, अहंकार संपतो आणि फक्त परमेश्वराचे पाय आणि आपले समर्पित डोके उरतं – तिथेच खरी शांती आहे.


नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍